नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. लोकसभेत प्रारंभी दिवंगत सदस्य मुलायमसिंग यादव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. १२ वाजता सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्यांवरच्या चर्चेनं कामकाजाला सुरुवात झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमासंदर्भात सध्या सुरु असलेल्या वादाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. यावेळी कर्नाटक मधील सदस्यांनी गोंधळ करत त्यांच्या भाषणात अडथळे आणले. मात्र सभापती ओम बिर्ला यांनी यासंदर्भात कोणती नोंद केली जात नसल्याचं जाहीर केलं.
जी-ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असं बिर्ला यांनी आज सभागृहात सांगितलं. ही परिषद आणि जी-ट्वेंटी देशांच्या पीठसीन अधिकाऱ्यांची बैठक यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या नेतृत्वाखाली राज्यसभा नवी उंची गाठेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली. राज्यसभेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रधानमंत्री मोदी यांनी धनखड यांचं अभिनंदन केलं. धनखड यांचं जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असं मोदी म्हणाले. उपराष्ट्रपती हे शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यांनी सैनिक शाळेत शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे किसान आणि जवानांचे धनखड यांच्यामध्ये अंगभूत आहेत. असंही त्यांनी सांगितलं.
राज्यसभा ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे कारण देशाच्या अनेक प्रधान मंत्र्यांनी या सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलं आहे. उपराष्ट्रपतींना कायदेशीर बाबींचं उत्तम ज्ञान असल्याचं मोदी म्हणाले. सभापतींचं अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, इतर जबाबदाऱ्यांपेक्षा सभागृहाच्या रक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. अध्यक्षांना सार्वजनिक जीवनाचा प्रचंड अनुभव असल्याने सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत होईल, असे गौरवोद्गार उपाध्यक्ष हरीवंश यांनी काढले.
द्रमुकचे खासदार तिरुची शिवा, तृणामूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय, आपचे राघव चड्डा आणि इतर सदस्यांनीही धनखड यांचं कौतुक केलं. तत्पूर्वी, संसदेचं हिवाळी अधिवेशन अधिक उपयुक्त ठरावं यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बातमीदारांशी बोलतांना सर्व राजकीय पक्षांना केलं. या अधिवेशनात युवा सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी द्यावी असं ते म्हणाले. देशाला प्रगतीच्या नव्या शिखरापर्यंत नेण्यासाठीच्या उद्देशानं या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितलं.