भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन केले जाईल – मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत
Ekach Dheya
नागपूर : “लातूर व उस्मानाबाद येथे 1993 साली झालेल्या भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन झालेले असून काही पात्र बाधित यापासून वंचित असतील तर तपासून घेऊन त्यांचेही पुनर्वसन केले जाईल”, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना दिली. यासंदर्भात विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
श्री. उदय सामंत म्हणाले की, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपात बाधित झालेल्या गावांमध्ये गाळ साचलेला होता. यात 70 टक्के नुकसान झालेल्या गावांना स्वत:च स्वत:चे पुनर्वसन करावयाचे होते. तशा सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या होत्या. पुनर्वसनासाठी 45 हजार कोटींचा प्रस्ताव आहे. तसेच 726 गावांच्या पुनर्वसनासाठी निधी दिला असून पुनर्वसन करुन घरे ताब्यात देण्यात आलेली आहेत. या गावांतील रस्ते इतर सोयी-सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करुन देण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.