महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपदक
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपद मिळालं आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ७५ किलो वजनी गटात लवलिना बोर्गोहाईन हिने अरुंधती चौधरीचा ५-० असा पराभव केला, तर ५० किलो गटात निखत झरीनने रेल्वेच्या अनामिकाचा ४-१ असा पराभव केला.
हरियाणाच्या मनीषा आणि सविती बुरा, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या साक्षी, मध्य प्रदेशच्या मंजू बांबोरिया यांनीही या स्पर्धेत आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकलं आहे. विजेत्यांना युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण १० पदकांसह रेल्वे संघाने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर मध्य प्रदेशने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्यांसह दुसरे, आणि हरियाणाने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांसह तिसरं स्थान पटकावल आहे.