Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इतर मागास प्रवर्गासाठी राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना – मंत्री उदय सामंत

नागपूर : राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सामंत उत्तर देत होते.

ते म्हणाले की, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील फक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थी निवड करतांना विधवा/विधूर/दिव्यांग/अनाथ/परित्यक्ता/वयोवृध्द या व्यक्तींचा प्राधान्याने समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

गृहनिर्माण विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जाते. या  योजनेंतर्गत ज्यांचे देशात कोठेही घर नाही, अशा व्यक्तींना घर मंजूर केले जाते. त्यासाठी केंद्र शासनामार्फत दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख असे अडीच लाख रुपये इतके अनुदान दिले जाते. मात्र या योजनेंतर्गत कोणतेही आरक्षण ठेवण्यात आलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याच्या ग्रामीण भागात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना (सामाजिक न्याय विभाग), शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिम आवास योजना व पारधी आवास योजना (आदिवासी विकास विभाग), अटल बांधकाम कामगार योजना (ग्रामीण कामगार विभाग), यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) आदी योजना राबविण्यात येत असल्याची माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

Exit mobile version