महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ
Ekach Dheya
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ८ विभागांच्या क्रीडा ज्योतीचे समायोजन करून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव रणजित सिंग देओल आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झेंडी दाखवून क्रीडाज्योत रॅलीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष संजय शेठे, सहसचिव प्रशांत देशपांडे, क्रीडाज्योतीचे मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी, छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलचे शिक्षक, क्रीडा शिक्षक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कवायत आणि योगासन प्रात्यक्षिक सादर केले. नूतन मराठी विद्यालय, रेणुका स्वरूप, अहिल्या देवी हायस्कूल, विमलताई गरवारे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात क्रीडाज्योत रॅलीचे स्वागत केले. या उपक्रमात मार्गावरील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडा मंडळे, खेळाडू सहभागी झाले.
क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पोहोचली.
आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंतने रॅलीचे नेतृत्व केले. त्यांच्या सोबत खेलरत्न पुरस्कारार्थी पद्मश्री शीतल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी, तसेच अनेक राष्ट्रीय खेळाडू या रॅलीत सहभागी झाले.