विज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे- शेखर मांडे
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे लाभ सामान्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असून त्यामुळेच आपला समाज खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं सीएसआयआर, अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी संचालक शेखर मांडे यांनी म्हटलं आहे. ते आज आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये विज्ञान आणि समाज या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. पर्यावरणामधले बदल ही मानवापुढली सर्वात मोठी समस्या असून ती दूर करण्यासाठी २०२७ सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं लक्ष्य आहे, आणि त्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक धोरणं आखली जात असल्याचं ते म्हणाले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या महासचिव डॉ, विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. सीएसआयआर चे शिवकुमार राव, विद्यापीठाचं कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि समाज यामध्ये घनिष्ठ संबंध निर्माण व्हायला हवेत असं डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितलं. विदर्भात दुग्धव्यवसाय आणि मासेमारी सारख्या क्षेत्रात आधुनिक तंत्राचा तवापर केला तर विकासाला चांगली गती मिळेल असं शिवकुमार राव यांनी सांगितलं. नोबेल पुरस्कार प्राप्त इस्त्रायलच्या ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञ प्रा.ॲडा योनाथ या परिसंवादाला उपस्थित होत्या.