नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन, सायबर तंत्रज्ञान, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संरक्षण विषयक सामुग्रीच्या उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत भरलेल्या देशोदेशीच्या राजदूतांच्या परिषदेत आज ते बोलत होते. संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी प्रोत्साहन देणारं वातावरण निर्माण करण्यात आलं असून त्यामुळे ही सामुग्री निर्यात करणाऱ्या आघाडीच्या देशांमधे आता भारताचा समावेश होतो असं त्यांनी सांगितलं. गेल्या ५ वर्षात या वस्तूंच्या निर्यातीत ८ पट वाढ झाली असून ७५ पेक्षा जास्त देशांना निर्यात केली जाते.
येत्या फेब्रुवारीमधे बेंगळुरुत होऊ घातलेल्या एअरो इंडिया प्रदर्शनाचा उल्लेख करुन त्यांनी सांगितलं, की नवीन कल्पना आणि प्रकल्पांना संधी देणारा हा कार्यक्रम असणार आहे. जी २० देशांमधे परस्पर सहमतीचं वातावरण तयार करणं हे भारताचं उद्दिष्ट असून अधिक सुरक्षित, समृद्ध आणि शाश्वत जग निर्माण करण्यावर अध्यक्ष पदाच्या कालावधीत भारताचा भर राहील,असं त्यांनी सांगितलं.