मुंबई : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या निवृत्तीवेतनाचा तपशील www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना आपला हा तपशील जाणून घेता येईल, अशी माहिती अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी आपला निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनविषयक तपशील जाणून घेण्यासाठी www. mahakosh.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर NIVRUTIVETANVAHINI या टॅबवर क्लिक करावे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर लॉगिन करण्याकरिता युजरनेम PENSIONER असे टाईप करावे. पासवर्ड ifms123 असा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉगिन करावे. लॉगिन झाल्यानंतर स्क्रीनवर वर्क लिस्ट व पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट असे दोन टॅब दिसून येतात. पेन्शर्नर कॉर्नर रिपोर्ट वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून निवृत्तीवेतनधारकाला त्याचे दरमहा किती निवृत्तीवेतन दिले जाते याची माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
वर्कलिस्ट टॅब वर क्लिक केल्यास क्रियेट पेन्शनर युजर या टॅब वर क्लिक करून निवृत्तीवेतनधारकास स्वत:चे स्वतंत्र लॉगिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन युजरनेम आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने त्यांचा निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक, निवृत्तीवेतन बँक खाते, अचूक नोंदवणे आवश्यक आहे. निवृत्तीवेतनाची अचूक माहिती भरून क्रियेट युजर वर क्लिक केल्यास निवृत्तीवेतनधारकाला स्वत:चे लॉगिन (युजर नेम व पासवर्ड) उपलब्ध होईल. या नवीन युजर नेम आणि पासवर्ड ने लॉगिन केल्यानंतर निवृत्ती वेतनधारकास स्वत:च्या निवृत्ती वेतनाची तपशीलवार माहिती उपलब्ध करून घेता येईल, निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे ही अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळवले आहे.