नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गरीब क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्यासाठी निःक्षय मित्र ही योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरु केली आहे. भारताला सन २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याच्या ध्येयाचा तो एक भाग आहे. त्यानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेनं पन्नास क्षयरुग्णांना दत्तक घेतलं आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्टपूर्तीसाठी टी. बी. मुक्त भारत अभियान देशभरात राबविण्यात येत आहे.
योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, सामाजिक संस्था आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेवू शकतात. पोषक आहार उपलब्ध नसलेल्या व्यक्तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण अधिक असतं. अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असं नाही. यामुळे क्षयरुग्णांसाठी पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे क्षयरुग्णांसाठी पोषण आहार संच तयार करण्यात आले आहेत. पोषण आहार घेण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पोषण आहारासाठी मदत करावी, असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कोल्हापूर शाखेनं दत्तक घेतलेल्या ५० पैकी १५ रुग्णांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोषण आहार संचाचं वाटप करण्यात आलं. रेडक्रॉसच्या पुढाकाराचं कौतुक करत समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन रेखावार यांनी केलं आहे.