नवी दिल्ली(वृत्तसंस्था): संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. संसद भवन संकुलात आयोजित या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. अधिवेशनाच्या कार्यकाळात सर्वपक्षीय खासदारांनी सदनाच्या कामकाजात सहकार्य द्यावं असं आवाहन प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं. आजची बैठक सकारात्मक वातावरणात झाली, तसंच यामध्ये २७ राजकीय पक्ष सहभागी झाल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना दिली.
अर्थसंकल्पीय बैठकीत सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं ते म्हणाले. येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ सादर होणार आहे. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ६ एप्रिलपर्यंत चालणार असून त्याच्या ६६ दिवसांच्या कालावधीत एकूण २७ सत्र होणार आहेत.संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षणही मांडलं जाईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राज्यातल्या खासदारांची बैठक घेणार आहेत.