नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प असून आयात कमी करुन ऊर्जा क्षेत्राला उभारी देणारा आहे असंही ते म्हणाले. यंदाचा अर्थसंकल्प हा भविष्याचा वेध घेणारा असून तो पर्यावरण पूरक आहे. मध्यमवर्गीयांचा, युवकांचा विचार करुन त्यांना शक्ती देणारा आहे अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी आपल्या ट्विट संदेशात दिली आहे. करोडो भारतीयांचे जीवन सहज करणारा हा अर्थसंकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा दिला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावलं उचललेली नाहीत. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांना लाभ देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे, असंही ते म्हणाले.