राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यानी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर या पथकाची भेट घेतली आणि त्यानंतर सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन दोस्ती अंतर्गत वैद्यकीय साधनं आणि मदत साहित्य घेऊन या पथकानं भारतीय हवाई दलाच्या सी-17 ग्लोबमास्टर विमानातून तुर्कीच्या दिशेनं उड्डाण केलं.सध्या श्वानपथकासह दोन बचाव पथकं आणि दोन वैद्यकीय पथकं तुर्कीमध्ये कार्यरत असल्याची माहिती मुरलीधरन यांनी दिली.
दोस्ती या शब्दाचा अर्थ हिंदी आणि तुर्कीश या दोन्ही भाषांमध्ये मैत्री असाच होतो आणि ऑपरेशन दोस्ती हे याच मैत्रीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन तुर्कीचे भारतातले राजदूत फिरात सुनेल यांनी केलं आहे.दरम्यान,आणखी शोध आणि बचाव पथकं,श्वानपथकं,शोधकार्यात लागणारं साहित्य आणि वैद्यकीय साहित्य तुर्कीला रवाना होण्यासाठी सज्ज असल्याचं भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.तुर्कीच्या हाताय इथं भारत 30 खाटांचं सुसज्ज रुग्णालयही उभारत आहे.