राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळले. त्यावर आम आदमी पार्टी आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी आरडाओरड करीत गदारोळ केला, आणि अखेर सभात्याग केला.
आभार प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणातला काही भाग वगळल्याचा मुद्दा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलं की पूर्ण भाषण नोंदीतून वगळलेलं नाही.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत भाषण करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरच्या चर्चेत ते सहभागी होणार असल्याचं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहाला सांगितलं.