Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश : मंत्री उदय सामंत

मुंबई : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले गेल्यामुळे नद्या प्रदूषित होतात. नर्सरी प्लांटच्या माध्यमातून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कामवरी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेला वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. या महानगरपालिकेच्या हद्दीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी विनाप्रक्रिया कामवरी नदीमध्ये मिसळले जात असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या लेखी उत्तरात सांगितले. राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना दिली. सदस्य रईस शेख यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

Exit mobile version