नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाच्या विकासात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून डिजिटल भारताचे फायदे समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सध्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जीवनमान सुलभ करण्याच्या उद्देशावर भर देण्यात आला आहे,असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जीवनमान सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावरच्या वेबिनार मध्ये केलं.
एकविसाव्या शतकातला बदललेला भारत तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपल्या नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असून हा बदल जनतेला स्पष्टपणे जाणवू लागला आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांमुळं गरीब आणि वंचित घटकांच्या जीवनमानात सुधारणा झाल्या असल्याचंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.
देशाची जनता शासनाला विकासासाठी प्रेरक घटक मानते, उत्तम नागरी सेवा देण्यासाठी अन्य देशांनी सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन त्याचे मूल्यमापन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. वन नेशन वन रेशनकार्ड या तंत्रज्ञानावर आधारित योजनेमुळेच अनेक गरीब कुटुंबाना रेशन मिळू लागलं. कोवीन ऍपनं कोव्हिडच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कर्मयोगी प्लॅटफॉर्म अद्ययावत करून त्याबाबत वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली. सूक्ष, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी मागच्या काही वर्षात शासनानं भरीव प्रयत्न केले असल्याचंही त्यांनी याप्रसंगी नमूद केलं.
फाईव्ह जी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा ,उद्योग औषध, शिक्षण आणि शेती क्षेत्रावर होणार्या प्रभावाचा विचार केला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांच्या निदान दहा महत्त्वाच्या समस्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ओळखून त्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.