मुंबई : औरंगाबादच्या पैठणीतल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून ५१ हजार ८९३ क्सुसेक्स इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडीचे दरवाजे उघडण्याची गेल्या महिन्यातली पाचवी वेळ आहे. विशेष म्हणजे धरणाच्या इतिहासात गेल्या १०० दिवसात धरणात १०० टक्के पाणीसाठा असल्याची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा ओघ सुरु असल्यानं हे दरवाजे पुढले काही दिवस उघडेच राहतील.
जायकवाडीतून सोडण्यात येत असलेलं पाणी लक्षात घेता नांदेड पाटबंधारे विभागानं विष्णुपुरी’ प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले आहेत. यातून एक लाख १६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. सततच्या पावसामुळेही पुराच्या पाण्याची पातळी वाढत आहे.
नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिला आहे. एक तास वगळला तर आज दिवसभर पावसानं विश्रांती घेतली.