Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि विधानसभा मतदारसंघातील 48 पैकी तब्बल 40 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. चारही मतदारसंघात दुरंगी लढत झाल्याने उर्वरित उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला असून त्याची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

गेली अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली. मतदार राजाचा कौल काहींसाठी तारक तर काहींसाठी मारक ठरला. चार मतदार संघात 40 उमेदवारांना स्वत:चे ‘डिपॉझिट’ही वाचविता आले नाही. उमेदवाराला मतदार संघात प्रत्यक्षात झालेल्या एकूण मतांच्या किमान एक षष्ठांश मते मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळातील बहुतांशी उमेदवार त्यात अपयशी ठरल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले.

चारही मतदारसंघातून 48 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अवघ्या चार उमेदवारांना त्यांचे ‘डिपॉझिट’ (अनामत रक्कम) वाचवता आले आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातून 18 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी एक लाख 77 हजार 595 मतदान झाले. येथील उमेदवाराला डिपॉझिट वाचविण्यासाठी किमान 29 हजार 599 मतांची आवश्‍यकता होती. मात्र त्यात 16 उमेदवारांना अपयश आले.

चिंचवड मतदार संघातून 11 उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी दोन लाख 78 हजार 231 मतदान झाले. येथील उमेदवाराला किमान 46 हजार 272 मतांची आवश्‍यकता होती. मात्र, नऊ उमेदवारांना एक षष्टांश मते मिळविता आली नाहीत.

भोसरी विधानसभा मतदार संघात दोन लाख 63 हजार 463 एवढे मतदान झाले होते. त्यानुसार उमेदवाराला ‘डिपॉझिट’ वाचविण्यासाठी 43 हजार 910 मतांची आवश्‍यकता होती. येथील 12 पैकी 10 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे.

मावळ विधानसभा मतदार संघात दोन लाख 47 हजार 963 मतदान झाले. त्यानुसार उमेदवाराला अनामत रक्‍कम वाचविण्यासाठी 41 हजार 327 मते मिळणे आवश्‍यक होते. येथील सात पैकी पाच उमेदवारांना आपली अनामत रक्‍कम वाचविता आली नाही.

Exit mobile version