होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Ekach Dheya
मुंबई :- “होळी व धूलिवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो. समाज आणि वैयक्तिक द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करूया,” अशा शुभेच्छा महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी होळी आणि धूलिवंदननिमित्त दिल्या आहेत.
आपल्या संस्कृतीत सणांची फार मोठी परंपरा आहे. या सणासुदीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आणि समाज जोडला गेलेला आहे. तसेच आजपर्यंत राज्यातल्या गावागावात, देश-विदेशात साजरा होणाऱ्या होळी, धूलिवंदनाच्या सणाला प्राचीन संदर्भ, ऐतिहासिक महत्त्व आहे. सणाच्या निमित्ताने एक वेगळे वातावरण आपल्याकडे पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांना एकत्र आणणारा हा सण प्रत्येकाचा सन्मान, निसर्गाचा समतोल राखत साजरा केला पाहिजे. होळीसाठी वृक्षतोड न करणे, धूलिवंदनासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करणे, रंग लावताना डोळ्यांना, शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सर्वांनी हा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.