राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावरील उपचार मोफत
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. दर बुधवारी विनामूल्य तपासणी केली जाणार आहे. महिला दिनानिमित्त स्तन कर्करोग जागृतीकरता हे अभियान सुरू केलं आहे.
राज्य शासनामार्फत स्तनाच्या कर्करोगावर मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आज जागतिक महिला दिनी केली. यशिवाय कोणत्याही रूग्णालयात महिलांना स्तन कर्करोगाच्या तपासासाठी किंवा उपचारासाठी केस पेपर मोफत करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं.
मुंबईत कामा आणि आलब्लेस रूग्णालय इथं स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती आणि उपचार अभियानाच्या शुभारंभावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत स्तन कर्करोगाबाबत बाह्य रूग्ण विभाग (ओपीडी) सुरू करणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं.
स्तनाच्या कर्करोगाचं निदान वेळेत होऊन त्वरित उपचार व्हावेत, यासाठी ही स्तन कर्करोग जागृती मोहीम हाती घेतली असल्याचं ते म्हणाले. स्तन कर्करोगाचं निदान त्वरित होण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या स्तनाचा कर्करोग निदान केंद्राचे उद्घाटनही महाजन यांच्या हस्ते यावेळी झालं.