महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): महिलांच्या विकासाला अग्रक्रम देऊन देश प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधे दूरदृष्यप्रणालीमार्फत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी केलेल्या तरतुदींची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं बांधून पूर्ण झाली आहेत त्यातली बहुतांश महिलांच्या नावावर असून महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना साडेसातटक्के व्याज दर देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महिला बचत आणि स्वयंसहाय्यता गटांची भूमिका, श्रीअन्न उत्पादनात आदिवासी महिलांच्या पारंपरिक शेतीच्या ज्ञानाचं योगदान, सहकारक्षेत्रात महिलांचा सहभाग, इत्यादींचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला.