नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सक्षमीकरणाचं प्रतिबिंब क्रीडाक्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीत पहायला मिळतं असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिला खेळाडूंसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या खेलो इंडिया दस का दम क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन आज नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुलात ठाकूर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.
31 मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांच आयोजन देशातील 50 शहरांमध्ये करण्यात आलं असून, त्यात सुमारे 15 हजार महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. 10 क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धा होणार असून, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर खेळू न शकलेल्या महिला खेळाडूंना त्यात सहभागी होता यावं, आणि देशातील दुर्गम भागातील महिला खेळाडूना व्यासपीठ मिळावं हा या स्पर्धा आयोजन मागचा मुख्य उद्देश आहे.