तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): कोट्यवधी तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार गेल्या काही वर्षांत कौशल विकास केंद्रांद्वारे अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. “पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान” या विषयावरच्या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला ते आज संबोधित करत होते. प्रधानमंत्री पुढे म्हणाले की, या योजनांद्वारे तरुणांना देशात मुबलक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तरुणांना दर्जेदार काम करता यावं यासाठी कौशल्य विकासाच्या क्षेत्रात, लक्ष केंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता असून, प्रधानमंत्री-विश्वकर्मा योजना ही त्या विचारसरणीचा एक भाग असल्याचं ही प्रधानमंत्री म्हणाले. पीएम-विश्वकर्मा योजनेचा उद्देश पारंपारिक कारागीर, त्यांच्या समृद्ध परंपराचं जतन करणं आणि त्यांचा विकास करणं हे देखील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
प्रत्येक विश्वकर्मा योजनेच्या सभासदाला विनासायास कर्ज मिळेल. स्वातंत्र्यानंतर कारागिरांना सरकारकडून जी मदत आवश्यक होती, ती म्हणावी तशी आणि योग्य त्या प्रमाणात मिळाली नसल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. यामुळे अनेक व्यावसायिक वडिलोपार्जित व्यवसाय सोडून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणाले की, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान हा भारतातील कारागीरांसाठी असून त्याचा उद्देश उत्पादित मालाची क्षमता, व्याप्ती आणि पोहोच वाढवणं हे आहे. खेड्यापाड्यातील तसचं शहरांमधील विविध कारागीर पारंपरिक उपकरणं वापरून उदरनिर्वाह करतात, पीएम-विश्वकर्मा योजना अशा मोठ्या आणि विखुरलेल्या समुदायासाठी असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.