राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळं जिल्ह्यातल्या कांदा आणि भाजीपाल्याच्या पिकांसह द्राक्षांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
आज सकाळपासून बाजार समित्यांमधली कांदा आवक लक्षणीय प्रमाणात घटली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांवर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी अपेक्षित उपाययोजना कराव्यात, अशी सूचना कृषी विभागानं केली आहे. तर या कालावधीत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
मुंबई,ठाणे, धुळे, अकोला, नंदूरबार,नाशिक, कोल्हापूर, पिंपरी पुणे,नागपूर, सातारा, जळगाव, बुलडाणा, वाशिम या भागात पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली. ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडला. पालघर जिल्ह्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं रब्बी हंगामात पिकलेला गहू, हरभरा, मका, बाजरी पिकांचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात गारगोटी भागात वादळी वाऱ्यासह दमदार पावसानं हजेरी लावली. आजरा तालुक्यात एक ते दोन ठिकाणी गारपिटीची नोंद झाली आहे.