Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लोकशाहीबाबत राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान आणि अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी या दोन मुद्द्यांवरुन आज सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. गोंधळामुळं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राहुल गांधी यांनी देशातल्या लोकशाहीसंदर्भात केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशा घोषणा लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी द्यायला सुरुवात केली. अदानी समूह प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी या मागणीसाठी काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सदस्यांनी घोषणा दिल्या.

सभापती ओम बिरला यांनी सदस्यांना शांत राहण्याची विनंती वारंवार केली मात्र गदारोळ सुरुच राहिला. सभापतींनी प्रश्नोत्तरांचा तास घेण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत अदानी समूहाची चौकशी आणि इतर मुद्द्यांवर विरोधई पक्षांनी दिलेला स्थगन प्रसताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. त्याचवेळी सत्ताधारी पक्षसदस्यांनी राहुल गांधींकडून  माफीची मागणी करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. कांग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इतर विरोधी सदस्यांनी प्रतिघोषणा द्यायला सुरुवात केली. गदारोळ कायम राहिल्यानं दोन वाजेपर्यंत सभागृहाचं कामकाज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी स्थगित केलं.

Exit mobile version