मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यांनी आज विधानपरिषदेत विशेष सत्रात केली. ही गारपीट इतकी मोठ्या प्रमाणात होती की यामुळे द्राक्ष, मोसंबी,डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारनं त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असंही ते म्हणाले.
सभागृहाचं नियमित कामकाज सुरू होताच अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावही मांडला. नुकसानग्रस्त भागात अजून पंचनामे सुरू झालेले नाहीत, तर दुसरीकडे हे सरकार सभा समारंभात मग्न आहे अशी टीका त्यांनी केली.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ६ शेतजकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जनावरेही दगावली आहेत त्यामुळे यावर तातडीने चर्चा घेऊन सरकारने निर्णय घ्यावेत अशी मागणी दानवे यांनी केली.
एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, सरकारनं तात्पुरता पर्याय दिला असून शेतकऱ्यांनी पाठवलेल्या मोबाईल छायाचित्राचीही नोंद घेण्यात येईल असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं. यासाठी मोबाईल क्रमांक आणि लँडलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. पंचनाम्यांमध्ये ही छायाचित्र ग्राह्य धरली जातील असं सत्तार यांनी सांगितलं.
राज्यातील खाजगी संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा देखभालीसह आणि शिक्षकेतर कर्मचार्यांसकट ताब्यात घेण्याची सरकारची तयारी आहे, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तसंच शिक्षण संस्था चालकांशी साधक बाधक चर्चा करूनच यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.