मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जातेय, तरीही राज्याचे गृहमंत्री काहीही करत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज ठाण्यात, हल्ला झालेल्या रोशनी शिंदे हिची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं ते म्हणाले. त्यावर, आपण गृहमंत्री असल्यानं अनेकांना अडचण होते आहे, परंतु टीका करणाऱ्यांना जनताच उत्तर देईल असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस म्हटलं आहे. ते आज यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. कुठल्याही घटनेची निष्पक्ष चौकशी आपलं सरकार करेल, परंतु त्यावर राजकारण करू नये, असं ते म्हणाले.
तर, विरोधी पक्ष म्हणून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी परंतु देवेंद्र फडनवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर केलेली टीका खपवून घेणार नाही, वेळ पडली तर मातोश्रीबाहेरसुद्धा या विरोधात आवाज उठवू, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.