नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सिक्कीम मधल्या गंगटोक जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१० वर जवाहरलाल नेहरू मार्गावर १४ मैल परिसरात अचानक झालेल्या भूस्खलनात २५ ते ३० पर्यटक आणि पाच ते सहा वाहनं अडकून पडली आहेत. आतापर्यंत २३ पर्यटकांना वाचविण्यात यश आलं असून त्यापैकी सहा पर्यटकांची खोल दरीतून सुटका करण्यात आली आहे. त्या सर्व पर्यटकांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवळपास दीडतास अडकून पडलेल्या एका महिलेची सुटका करून गंगटोक इथल्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय, रस्त्यावरून बर्फ हटवून अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली आहे.भारतीय सैन्य दल, सीमावर्ती रस्ते संस्था अर्थात BRO, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत बचावकार्य अद्याप सुरूच आहे.