राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार आहे. राज्य शासनाच्या भूजल विकास आणि सर्वेक्षण यंत्रणेद्वारे भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी केली जाते.त्यातून ते पाणी वापरण्यायोग्य आहे की नाही याबद्दलचा निर्णय घेतला जातो.सध्या राज्यातील काही ठराविक शहरात उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेतूनच भूजलाची तपासणी केली जात होती. त्यातील असुविधा आणि होणाऱ्या विलंबाचा कालावधी लक्षात घेऊन या तपासणीसाठी आता २ फिरत्या प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यावरील अद्ययावत यंत्रणेमुळं भूजलाचा नमुना तपासणीसाठी घेणे सहज सोपे बनले असून या प्रयोगशाळेतच त्याची लगेच तपासणी केली जाते . सध्या नागपूर विभागात कार्यरत असलेल्या या प्रयोगशाळांच्या धर्तीवर राज्यातील सर्व महसुली विभागात लवकरच अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज फिरत्या प्रयोगशाळा सुरु होत आहेत.त्यामुळं भूजलाची तपासणी प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार असून भूजलाच्या पुनर्भरण प्रक्रियेसाठी देखील त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.