नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास उद्या सकाळी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून त्यात झालेले निर्णय गव्हर्नर उद्या सकाळी १० वाजता जाहीर करणार आहेत.
गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळं कर्जाचा हप्ता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळं आतातरी हे दरवाढीचं चक्र थांबणार की सुरूच राहणार याची प्रतीक्षा सामान्य नागरिकांसह आर्थिक क्षेत्राला आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळं विस्कटलेली जागतिक पुरवठा साखळी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं केलेली व्याजदर वाढ आणि देशातली महागाई आटोक्यात ठेवण्याचं आव्हान या कारणांमुळं रिझर्व्ह बँकेनं ही दर वाढ केली होती. पण आता चलनवाढीचा दर आटोक्यात आल्यानं आणि फेडरल रिझर्व्हवर अवलंबून न राहता रिझर्व्ह बँकेनं स्वतंत्र भूमिका घ्यावी असा सल्ला स्टेट बँक समुहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी इकोरॅप या अहवालात दिला आहे.