Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक आज दूरदृष्यप्रणालीमार्फत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देशभरातल्या आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा मांडवीय यांनी घेतला. कोविड संदर्भात कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज राहावं आणि येत्या 10 आणि 11 तारखेला राज्यसरकारांनी जिल्हा पातळीवर प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची प्रात्यक्षिकं आयोजित करावी असं त्यांनी सांगितलं. फ्लू सदृश आजाराच्या प्रादुर्भावावरही बारकाईनं लक्ष ठेवावं, तपासणीत संसर्ग आढळल्यास त्या नमुन्यांचं जनुकीय क्रमनिर्धारण करावं अशा सूचना त्यांनी केल्या.

कोविड संसर्गाचे प्रकार कितीही बदलले तरी तपासणी, माग काढणे, उपचार, लसीकरण आणि कोविडविषयक आचारसंहितेचं पालन या पाच मुद्द्यांवरच प्रतिबंधाचे प्रयत्न अवलंबून राहतील असं मांडवीय म्हणाले.  तपासण्यांचा वेग वाढवावा त्यातही अचूक निदानासाठी  RT-PCR तपासण्यांवर भर द्यावा असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.  देशात सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत असून दर आठवड्याला सरासरी 4 हजार 188 नवे रुग्ण आढळत आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. लशीचा पहिली मात्रा आतापर्यंत 90 टक्के लोकसंख्येला देऊन झाली असली तरी पुढच्या मात्रा दिल्या जाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवावा तसंच ज्येष्ठांची आणि इतर संवेदनशील  घटकांची विशेष काळजी घ्यावी असं डॉ. मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.

Exit mobile version