Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रकाशाचा सण दीपावलीचा देशभरात उत्साह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जातं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी म्हणजे निराशेवर आशेचा विजय, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रत्येकाने वंचितांच्या, दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं, असं नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रात नरक चतुर्दशी निमित्त पहाटे चंद्रोदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे. सकाळी सर्वांनी उत्साहाने ती साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शुभेच्छा दिल्या.

घरोघरी कंदील आणि पणत्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती. रस्ते रांगोळ्यांनी सजले होते. संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची दिवाळी पहाट अनेक ठिकाणी रंगली.

Exit mobile version