नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीनंतरच जागा वाटपाबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांच्यासह भाजपा बंडखोर मीरा भाईंदर मधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.
रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं, तर गीता जैन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. शिवसेनेच्या दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.