नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ३१ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या आयोजनाची तयारी पूर्ण होत आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या ७०० जिल्ह्यांमधून लाखो लोक सहभागी होणार आहेत.
या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कावडीया या ठिकाणच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते दिल्लीतल्या ध्यानचंद नॅशनल स्टेडियम पासून निघणाऱ्या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. ही दौड ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या काल प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातूनही लोकांना या एकता दौडमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं आहे.