नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांविरोधातल्या मोहिमेवरून, दंतेवाडा इथं परतत असलेल्या, डीस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड -जिल्हा राखीव रक्षक दलाचं वाहन, नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट करून उडवलं. त्यात दहा जवान आणि एक वाहन चालक, अशा ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी, या भ्याड हल्ल्याचा, तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या हल्ल्याची गंभीर दखल घेत तत्काळ मुख्यमंत्री बघेल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. नक्षलवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही शाह यांनी दिली आहे.