Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराकमधल्या चार संसद सदस्यांनी दिला राजीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमध्ये सुरु असलेली निदर्शनं हातळण्यात सरकारला अपयश आल्याचं कारण देत, इराकमधल्या चार संसद सदस्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दिल माहदी यांच्यावरचा दबाव अधिक वाढला आहे. सत्ताधारी प्रशासनात मोठे फेरबदल करावेत या मागणीसाठी इराकमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या निदर्शनांमुळे तिथलं वातावरण ढवळून निघालं आहे.

निदर्शकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं अश्रूधुराचा, तसंच बळाचा वापर करत गोळीबारही केला. मात्र त्यानंतरही, निदर्शकांनी न जुमानता सुरु ठेवलेल्या आंदोलनांनं हिंसक वळण घेतलं असून, आतापर्यंत २००हून अधिक जण ठार झाले आहेत. संसदेतले कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेल्या सहीर फाहमी आणि हैफा अल आमीन यांनी शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा म्हणून राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या महिनाभरात संसदेनं काहीच केलं नाही, तसंच आंदोलकांविरोधातल्या हिंसक कारवाईला प्रधानमंत्री किंवा गृहमंत्रालयासह सुरक्षा दलांपैकी कोणालाही दोषी मानलं नाही असा आरोप या दोघांनी केला आहे. हे सरकार बरखास्त करून, तातडीनं मुदतपूर्व निवडणूका घ्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे. या दोघांशिवाय ताह अल दिफाई आणि मुझाहीम अल तमीमी या दोन संसद सदस्यांनीही काल राजीनामा दिला होता.

Exit mobile version