नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान, सहिष्णुता आणि सदाचाराचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान बुद्धांची जयंती देशात उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना आणि भगवान बुद्धांच्या जगभरातल्या अनुयायांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांचा साधा आणि प्रभावी उपदेश आपल्याला प्रेम, सत्य आणि अहिंसेची शिकवण देतो असं त्या म्हणाल्या. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम बुद्ध यांनी विचार आणि आचरणातून मानवतेच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. बुद्धांच्या या प्रगल्भ शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एका ट्विटच्या माध्यमातून प्रधानमंत्री म्हणाले की भगवान बुद्धांचे आदर्श सर्वांना मार्ग दाखवत आणि सामर्थ्य देत राहोत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस बुद्धांच्या शिकवणीचं मनन आणि चिंतन करण्याचा आहे. भगवान बुद्ध यांचा सर्वांप्रती अहिंसा, दया आणि प्रेमाचा संदेश स्मरणात ठेवून त्यांच्या तत्त्वांनुसार मार्गक्रमण करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.