नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात होणाऱ्या बैठकीनंतरच राज्यातल्या सत्तास्थापने संदर्भातलं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालचंच सरकार येणार असा ठाम विश्वास भाजपा प्रवक्ते जी. एल. व्ही. नरसिंह राव यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा मीरा भाईंदर मधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.
रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पत्र पाठवलं, तर गीता जैन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. शिवसेनेच्या दिलीप सोपल यांच्याविरोधात राऊत निवडून आले आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.