नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2018 च्या तुकडीच्या सनदी अधिकाऱ्यांशी तसेच भूतानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पटलावर भारताचे महत्व वाढत आहे हे लक्षात घेऊन भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे आणि परिषदेच्या मसुद्यात सुधारणा व्हाव्यात यासाठी सातत्यपूर्ण संवाद आवश्यक आहे असे नायडू म्हणाले.
जगातल्या सर्व उदयोन्मुख देशांना संयुक्त राष्ट्रात प्रतिनिधित्व मिळावे तसेच सुरक्षा परिषदेचा विस्तार आणि लोकशाहीकरण व्हावे यासाठी सर्व सहमती होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
भारतीय परराष्ट्र सेवा क्षेत्र निवडणाऱ्या युवा अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. भारताची संस्कृती आणि सभ्यता जगभरात पोहचवण्याची संधी या सेवेच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे युवा राजनैतिक अधिकारी जगात भारताचे प्रवक्ते आणि भारताची भूमिका मांडणारे दूत असतात असे त्यांनी सांगितले. भारताला जगाच्या अधिकाअधिक जवळ नेण्याचे काम निष्ठापूर्वक करावे असा सल्ला त्यांनी दिला.
दहशतवाद ही सगळ्या जगापुढची समस्या असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जगभरातल्या देशांना एकत्र आणण्याची मुत्सद्देगिरी परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनाच करावी लागते असे नायडू म्हणाले. भारताने शांतीदूत म्हणून जगभरात निर्माण केलेली प्रतिमा अधिक उजळ करण्याचे काम राजनैतिक अधिकाऱ्यांनी करावे असे नायडू यांनी यावेळी सांगितले.