देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्र सरकार समाजातली असमानता दूर करून प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचत आहे, देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात गेली अनेक दशकं विविध गृह निर्माण योजना अस्तित्वात असून देखील ग्रामीण भागात सुमारे ७५ टक्के घरांमध्ये शौचालयाची सुविधा नव्हती, २०१४ नंतर सरकारनं आपलं कार्य गरीबांना छत पुरवण्यापुरतं मर्यादित न ठेवता, घरांना गरीबीविरोधात लढण्याचा एक भक्कम आधार बनवलं, असं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणावरही भर दिला जात असून गेल्या ९ वर्षात सुमारे ४ कोटी घरं गरीब कुटुंबांना सुपूर्द करण्यात आली, त्यापैकी ७० टक्के घरं महिलांच्या नावावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.