जागतिक आरोग्य आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्यविषयक प्रयत्त्नांसाठी भारत कटिबद्ध आहे – प्रधानमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भविष्यात आपल्याला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि संपूर्ण जग अधिक आरोग्यपूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करण्यास भारत कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. जिनेव्हा इथल्या 76 व्या जागतिक आरोग्य सभेला त्यांनी दूरस्थ पद्धतीनं संबोधित केलं. भारताचे प्राचीन ग्रंथ वसुधैव कुटुंबकमचा संदेश आपल्याला देतात. भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेच्या आधारे भारत काम करत आहे. उत्तम आरोग्यासाठीचा भारतचा दृष्टिकोन एक पृथ्वी एक आरोग्य असा आहे, असं मोदी म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचं पारंपरिक औषधीवर आधारित पहिलं जागतिक केंद्र भारतात स्थापन होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षाच्या माध्यमातून जगाला भरडधान्याचं महत्त्व कळत आहे, याबद्दल समाधान वाटत असल्याचंही मोदी म्हणाले.