जीवाश्म इंधनाऐवजी अन्य पर्यायांचा वापर करण्याच्या दृष्टीने हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांची ऑस्ट्रेलियातल्या आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): जगभरात जीवाश्म इंधनाच्या ऐवजी अन्य पर्यावरणस्नेही इंधन पर्यायांचा वापर करण्याची गरज तसंच जगभरात हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी जागतिक उद्योगाशी भागीदारी करतील, असा विश्वास फॉर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक अँड्र्यू फॉरेस्ट यांनी आज सिडनी इथं मोदींशी झालेल्या भेटीनंतर व्यक्त केला. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियातल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
प्रधानमंत्र्यांनी पहिल्या बैठकीत फॉर्टेस्क्यू मेटल्स ग्रुप आणि फॉर्टेस्क्यू फ्युचर इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक अँड्र्यू फॉरेस्ट यांची भेट घेतली. या भेटीत भारतीय कंपन्यांना अक्षय ऊर्जा क्षेत्रात फॉरेस्ट समुहासोबत भागीदारीच्या विविध उपलब्ध संधींबाबत आणि भारताच्या हरित हायड्रोजन मिशन बाबत चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट संदेशामार्फत दिली आहे. प्रधानमंत्र्यांनी दुसऱ्या बैठकीत ऑस्ट्रेलियन सुपर चे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल श्रोडर यांच्याशी तसंच तिसऱ्या बैठकीत हैंकोक प्रोस्पेक्टिंग ग्रुपच्या अध्यक्षांशी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदींनी भारत हे गुंतवणुकीसाठी जगातलं सर्वात आकर्षक क्षेत्र असल्याचं सांगितलं आणि ऑस्ट्रेलियन कंपन्यांना भारताच्या विकासाच्या यशोगाथेत भागीदार होण्यासाठी आमंत्रित केलं.