नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे गाडी आसाममधल्या गुवाहाटीला पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपायगुडीला जोडणार आहे. ही गाडी हा प्रवास अवघ्या साडेपाच तासात होईल. आत्ताची सगळ्यात जलद रेल्वेगाडी हे अंतर साडेसहा तासात कापते. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे मार्गाच्या १८२ किलोमीटरच्या नव्यानं विद्युतीकरण झालेल्या विभागांचं तसेच आसाममध्ये लुमडिंग इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या डेमू/मेमू शेडचं लोकार्पण देखील केलं. यामुळे मेघालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा होईल.
गुवाहाटी- जलपायगुडी वंदे भारत ट्रेनमुळे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक शतकांपासून असलेल्या संबंधांना बळकटी मिळेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. केंद्र सरकारनं गरिबांच्या कल्याणाला प्राधान्य दिलं आहे, असं ते म्हणाले. घरं, शौचालयं, नळावाटे पिण्याचं पाणी, वीज, गॅस पाईपलाईन, एम्सचा विकास, रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग, बंदरे यांसारख्या पायाभूत सुविधांना दिलेली चालना आणि मोबाईल कनेक्टिविटी यांची उदाहरणं त्यांनी दिली.