नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपात युद्ध सुरु आहे, चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य तैनात केलं आहे तर दुसऱ्या बाजूला शेजारी देशांत आर्थिक आणि राजकीय समस्या आहेत यामुळे भारतासमोर वेगळी आव्हाने निर्माण झाली आहेत. पण सीमेवर नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थिरता राखणं हे भारतीय लष्कराचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केलं आहे. पुण्यात आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या उत्तर सीमेवर चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. १९६२ पासून ते मागे गेलेले नाहीत. भारतीय सीमेवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये अशी आशा आहे. मात्र, असे असतांना भारतीय भूभागाचे रक्षण ही संरक्षणदलांची जबाबदारी असून ती चोखपणे पार पाडू, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला.
मणिपूरमधील परिस्थितीबद्दल बोलताना चौहान म्हणाले कि, मणिपूरमध्ये बंडखोरीमुळे तणाव निर्माण झाला नसून दोन समाज गटांदरम्यानच्या वादामुळे वातावरण बिघडलं आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला आज प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यांनी संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली.
छात्रांच्या तालबद्ध संचलनाने सुरुवात झाली. संचलनाला सुरुवात झाल्यावर सुपर डीमोना विमानांनी हवाई सलामी दिली. प्रमुख पाहुण्यांनी यानंतर संचलनची पाहणी केली. एकूण ११७५ छात्र यामध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी २१४ लष्कराचे, ३६ नौदलाचे १०६ हवाई दलाचे तर १९ परदेशी छात्र होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी छात्रांना पदकं प्रदान करण्यात आली. यावेळी छात्र आफ्रिदी अफरोज याला सुवर्ण, अंशू कुमार याला रौप्य आणि प्रवीण सिंग याला कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं.
संचलनाच्या उत्तरार्धात तीन तीन छात्र संथ गतीने संचलन करत अंतिम पग कडे मार्गस्थ झाले. यावेळी सुखोई तसंच मिग या भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचं आकाशात आगमन झालं आणि विमानांच्या स्वनातीत वेगाने उपस्थितांना थक्क केलं. तीन वर्षांच खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रबोधिनीचे छात्र लष्कर, हवाई दल आणि नौदल अधिकारी प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल होतील. यंदा प्रथमच संचलन सोहळ्यात महिला छात्रांचा सहभाग होता. याबद्दल चौहान यांनी त्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या.