खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर सौदी अरेबियाने ही घोषणा केली. जुलै महिन्यासाठी जाहीर केलेली कपात त्यापुढेही कायम राहू शकेल, असं सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या काळात दिवसाला 9 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन केलं जाईल, आणि ते या वर्षाच्या सुरुवातीच्या दर दिवसाच्या उत्पादनापेक्षा दीड दशलक्ष बॅरल कमी असेल, असं यात म्हटलं आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी घटण्याची शक्यता लक्षात घेता, तेलाची किंमत वाढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, ओपेक देशांनी एप्रिल महिन्यात जाहीर केलेली तेल उत्पादनामधली कपात २०२४ सालाच्या अखेरीपर्यंत कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे या देशांमधून जागतिक बाजारपेठेत येणाऱ्या कच्च्या तेलात दिवसाला १ दशलक्ष बॅरल पेक्षा जास्त कपात होईल.