नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या पाच वर्षात भारताला ५ लाख कोटी अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सौदी अरबची राजधानी, रियाध इथं झालेल्या भावी गुंतवणूक प्रारंभिक परिषदेत ते बोलत होते.
स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे, स्टार्ट अप साठी गुंतवणूकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी, असंही मोदी म्हणाले. भारतातल्या स्टार्ट अप कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे.
तंत्रज्ञानाच प्रभाव, पायाभूत सुविधेचं महत्त्व, मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग, अनुकूल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत, असंही ते म्हणाले. भारत २०२४ पर्यंत तेल शुद्धीकरण, तेल वाहिन्या आणि वायू टर्मिनल साठी १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.