Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड – जेजुरी पालखी मार्गाची पाहणी

पुणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सासवड जेजुरी येथील पालखी मार्गाची आणि कऱ्हा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाची आज पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावरील रस्त्याचे कामे जलदगतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार संजय जगताप, , पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम, पुरंदरचे प्रभारी तहसिलदार मिलिंद घाडगे, दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार आदी उपस्थित होते.

श्री.चव्हाण यांनी यांनी दिवे घाटमाथ्यावरील पालखी विसावा, झेंडेवाडी ग्रामपचायतीने वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेला हिरकणी कक्ष, सासवड येथील कऱ्हा नदीवरील नवीन बांधण्यात आलेला पुल आणि जेजुरी येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी केली. ते म्हणाले, पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. सार्वजनिक विभागाच्यावतीने पालखी मार्गावरील रस्त्याच्या कामासह वारकऱ्यांना विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात.

पालखी मार्गावरील रस्त्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करावीत. रस्त्याच्या साईड पट्ट्या, रस्ता रुंदीकरण, रस्ता डांबरीकरण, आवश्यक ठिकाणी मुरूम भरणे, अतिक्रमण काढणे इत्यादी कामे राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने आणि बांधकाम विभागाने वेळेत पूर्ण करावीत. पुलाच्या जोडरस्त्याच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेवून पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सासवड मधील बोरकर कुटुंबीयांनी पुलाच्या जोड रस्त्यासाठी जमीन देवून सहकार्य केल्याने मंत्री श्री. चव्हाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता पवार यांनी पालखी मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती दिली.

Exit mobile version