Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानाचं कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संपूर्णपणे महिलांनी परिचालन केलेल्या पहिल्या भारतीय हज विमानानं काल कोझिकोड ते सौदी अरेबियातल्या जेद्दाहपर्यंत यशस्वीरित्या उड्डाण केलं. हा उल्लेखनीय पराक्रम एअर इंडिया एक्स्प्रेस या आंतरराष्ट्रीय एअरलाइनच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांमुळे शक्य झाला. या प्रवासा दरम्यान प्रत्येक गंभीर कामाची जबाबदारी महिलांनी घेतली. विमानात केवळ महिला प्रवासी ठेवण्याच्या भारतीय हज कमिटीच्या आवाहनाला या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला. विमान क्रमांक आय एक्स ३०२५ मध्ये एकूण १४५ महिला यात्रेकरू होत्या ज्या त्यांच्या हज यात्रेला निघाल्या होत्या. विमानाचं नेतृत्व कॅप्टन कनिका मेहरा आणि प्रथम अधिकारी गरिमा पासी यांनी कुशलतेनं विमानाचं उड्डाण केलं. त्यांच्यासोबत प्रतिभावान आणि समर्पित केबिन क्रू सदस्य होते. ज्यात बिजिथा M.B, श्रीलक्ष्मी, सुषमा शर्मा आणि शुभांगी बिस्वास यांचा समावेश होता. या सर्वांनी संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेची जबाबदारी उचलली.

एअर इंडिया एक्स्प्रेसमधल्या अन्य महिला कर्मचाऱ्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण होता. पडद्यामागे, निपुण महिलांच्या गटानं विमानाच्या अखंड परिचालनाला समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ग्राउंड टास्कची जबाबदारी घेतली. सरिता साळुंखे यांनी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या नियंत्रण कक्षामधून फ्लाइटच्या प्रगतीचं कुशलतेनं निरीक्षण केलं. मृदुला कपाडिया यांनी विमानाच्या मार्गावर बारीक नजर ठेवली. लीना शर्मा आणि निकिता जवंजाळ यांनी सर्व आवश्यक तयारी व्यवस्थित असल्याची खात्री करून, विमान उड्डाण कुशलतेनं हाताळलं. निशा रामचंद्रन, ऑन-ड्युटी सेवा अभियंता, विमानाच्या देखभालीसाठी जबाबदार होत्या.

Exit mobile version