Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मतदार याद्या बारकाईने अद्ययावत करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक प्रशिक्षण

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आगामी निवडणूकांच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांनी मतदार याद्या बारकाईने लक्ष देऊन अद्ययावत कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. प्रशिक्षणाला उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर उपस्थित होत्या.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदार संघ असून त्यापैकी ११ शहरी व १० ग्रामीण मतदार संघ आहेत. याद्या अद्ययावत करताना अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. याद्या अद्ययावत करताना ८० वर्षावरील मतदारांचे सर्वेक्षण करावे, पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सध्या आधुनिक सॉफ्टवेअर येत आहेत. त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांनी माहिती करुन घ्यावी. मतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये, स्थानिक संस्था याठिकाणी व्यवस्था करावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या कामाचा वेळोवेळी आढावा घ्यावा, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी ‘गरुडा’ ॲपबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला जिल्ह्यातील २१ मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version