भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
Ekach Dheya
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व अभियांत्रिकी संस्थांनी पुढाकार घेऊन या धोरणाच्या अंमलबजावणीस अधिक गती द्यावी, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा, मुंबई येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी एक दिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी,माजी कुलगुरू व सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, उद्योजक भरत अमलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वायत्त अभियांत्रिकी संस्था अभ्यासक्रमातील बदल अंमलात आणण्यासाठी सक्षम असतात. त्यांना संलग्न संस्थेप्रमाणे विद्यापीठावर अवलंबून राहावे लागत नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून स्वायत्त अभियांत्रिकी संस्थामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करून त्या अनुभवाच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षापासून हे धोरण इतरही ज्ञानशाखेच्या महाविद्यालयांमध्ये राबविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यामुळे देशभरात अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्याला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची अमंलबजावणी करून पुन्हा आपले स्थान अधिक भक्कम करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या धोरणानुसार अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्यातील गरजा आणि रोजगारांच्या संधी, नवीन संशोधनाचा अभ्यास करून विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता आणि नावीन्यपूर्ण शिक्षण, मातृभाषेतील शिक्षण, विद्यार्थ्यांना कसे सहज उपलब्ध होईल यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी पुढाकार घेतला आहे.
त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी अभियांत्रिकी बरोबरच बहुशाखीय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, केमिकल, कला, विज्ञान, भारतीय ज्ञानसंपदा, असे इतर शाखेचे विषय सुद्धा घेऊ शकतील. तसेच शिक्षणाबरोबर त्या त्या क्षेत्रातील प्रशिक्षणसुद्धा घेता येईल. हे या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
या धोरणाच्या अमंलबजावणीस अधिक गती देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.