नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लक्षद्वीप बेटं आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं आहे. या चक्रीवादळाला ”महा” हे नाव दिल्याची माहिती भारतीय हवामान विभागांना दिली आहे. हे वादळ सध्या ताशी २६ किलोमीटर वेगानं वायव्य दिशेला सरकत आहे.
लक्षद्वीपची राजधानी कवरत्तीपासून हे वादळ पूर्व – नैऋत्य दिशेला ८० किलोमीटर तर तिरुवनंतपुरमपासून पश्चिम – वायव्य दिशेला ४४० किलोमीटर अंतरावर आहे. उद्या या वादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
या वादळामुळे, तामिळनाडून, केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात येत्या दोन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज आहे. याच काळात लक्षद्वीप बेटं आणि केरळमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.